Showing posts with label अभिमानास्पद ( Proud ). Show all posts
Showing posts with label अभिमानास्पद ( Proud ). Show all posts

Saturday, July 25, 2026

नव्या दमाची नवी पिढी

नव्या दमाची नवी पिढी ही
झुकणे नाही ध्यानीमनी,
हुकूमशाहीने दाबू नका तिला
पाजेल तुम्हास ती पानी

अजूनही आहे वेळ हाताशी
देश हा त्यांचा आहे हो,
भेदभावाचे विष त्यांच्या मनी
पेरणे तुम्ही थांबवा हो

आशा झाल्या आज पल्लवित
पाहूनी हिम्मत तरुणाईची,
अशीच एकजूट अखंड ठेवूनी
रक्षा करावी लोकशाहीची

जनतेमध्ये फूट पाडणे
कठीण होऊन बसले हो,
पहिला विजय या तरूणाईचा
पाहून अंतर्मन हसले हो

हा तर तुमचा आरंभ आहे
इथून करूया नवी सुरूवात,
धडकी भरवू हुकूमशाहीला
भ्रष्ट व्यवस्थेवर करू आघात

✒️ K. Satish





Friday, October 20, 2023

स्त्री शक्तीचा जागर

जननी साऱ्या जीवांची ती अन्
महिमा तिचा हो अपरंपार
तिच्याविना ना अर्थ जगाला
तिच करी जीवन साकार

स्वराज्याची बीजे रोवली
घडवले थोर अशा राजाला
शूरवीर त्या माता जिजाऊ
मुलासम प्रेम दिले हो प्रजेला

स्वाभिमान त्यागाची मूर्ती
किती गावे तिचे गुणगान
माता रमाईच्याच कृपेने
मिळू शकले आम्हा संविधान

देशातील पहिल्या महिला शिक्षिका
महिलांना हो साक्षर केले
सावित्रीबाईंचे कार्य महान
मानवतेसाठी प्राण वाहिले

मृत्यूलाही मात दिली अन्
दिली दुःखितांना हो माया
माय ती बनली अनाथांची हो
सिंधुताई ममतेची छाया

ब्रिटिशांविरुद्ध रणशिंग फुंकले
पेटवल्या क्रांतीच्या वाती
चिरकाल हो टिकूनी राहील
राणी लक्ष्मीबाईंची ख्याती

ध्येय धोरणी धाडसी होत्या
देशाच्या त्या पंतप्रधान
इंदिरा गांधींना हो मिळाला
' सहस्त्राब्दीच्या महिला ' सन्मान

मूर्ती लहान पण कीर्ति मोठी
अगाध होती जिद्द सचोटी
अंतराळातील वीरांगना ती
कल्पना चावला भारत की बेटी

उपचाराविना मूल गमावूनी
डाॅक्टर बनण्याचा ध्यास घेतला
चूल अन् मूल ही प्रथा बदलूनी
आनंदीबाईंनी आदर्श घडविला

शिक्षण अन् खेळात तरबेज
देशातील पहिल्या आयपीएस
किरण बेदींचा धाक असा की,
गुंडांच्या उरी होतसे धस्स्

प्रतिकूल परिस्थितीशी लढली
मुष्टियुद्ध रिंगणात उतरली
पदकांवरती पदके जिंकूनी
मेरीकोमने कीर्ति घडवली

क्षमता आहे स्त्रियांमध्येही
बळकट त्यांचे हात करा
बुरसटलेले विचार सोडा
स्त्रीशक्तीचा जागर करा

✒ K. Satish





Friday, March 3, 2023

२५ वर्षे ५० लाख, टाटांचा प्रतिस्पर्ध्यांना धाक

दूरदृष्टी टाटा समूहाची

कष्टालाही नव्हते तोटे,

विश्वास ठेवूनी कर्मचाऱ्यांवरी

स्वप्न पाहिले होते मोठे


लावले २५ वर्षांपूर्वी

रोपटे त्यांनी असे अनोखे,

कार प्लान्टची केली निर्मिती

प्रतिस्पर्ध्यांचे वाढले ठोके


इंडिकाने सुरूवात जाहली

हळूहळू मग पाय रोवले,

यशापयशाचा स्वाद चाखूनी

स्थान आपुले भक्कम केले


२५ वर्षांनंतर आता

निरनिराळी वाहने टाटांची,

आधुनिक, सुंदर आणि भक्कम

पसंती त्यांना साऱ्या ग्राहकांची


५० लाख वाहनांचा टप्पा

एकजुटीने पूर्ण जाहला,

भाग्यवान आम्ही, आम्हाला

सहवास टाटा साहेबांचा लाभला

✒ K. Satish




Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts