Saturday, July 25, 2026

नव्या दमाची नवी पिढी

नव्या दमाची नवी पिढी ही
झुकणे नाही ध्यानीमनी,
हुकूमशाहीने दाबू नका तिला
पाजेल तुम्हास ती पानी

अजूनही आहे वेळ हाताशी
देश हा त्यांचा आहे हो,
भेदभावाचे विष त्यांच्या मनी
पेरणे तुम्ही थांबवा हो

आशा झाल्या आज पल्लवित
पाहूनी हिम्मत तरुणाईची,
अशीच एकजूट अखंड ठेवूनी
रक्षा करावी लोकशाहीची

जनतेमध्ये फूट पाडणे
कठीण होऊन बसले हो,
पहिला विजय या तरूणाईचा
पाहून अंतर्मन हसले हो

हा तर तुमचा आरंभ आहे
इथून करूया नवी सुरूवात,
धडकी भरवू हुकूमशाहीला
भ्रष्ट व्यवस्थेवर करू आघात

✒️ K. Satish





Thursday, July 9, 2026

अनुभव - सर्वश्रेष्ठ गुरू

संकटकाळी साथ सोडली
त्यांना दूर करावे
त्याही काळी सोबत राहिले
त्यांना नित्य जपावे

भरभराट असताना जो तो
मागे पुढे घुटमळतो 
गणित बिघडले थोडे तर मग
तोच तुम्हाला छळतो

बनावटी या दुनियेमध्ये
जिवलग असती थोडे
बाकी सगळे स्वार्थासाठी
मागे फिरणारे घोडे

त्या घोड्यांच्या गर्दीमधूनी
थोडे बाजूला जाऊन
सत्याची अनुभूती घ्यावी
एकांतामध्ये राहून

मृदू असावे हृदयामधूनी
दिसू कुणा न द्यावे
स्पष्ट बोलूनी कपटींना
स्थान त्यांचे दावावे

वाईट अनुभव येणे चांगले
अनिष्ट मुळीच नसते
भविष्यात येणारे संकट
त्यांच्यामुळेच तर फसते

✒️ K. Satish





Tuesday, July 7, 2026

पाऊल प्रगतीचे

कपटी, खोटे हितचिंतक
दूर जाऊ लागले
तेव्हा पाऊल प्रगतीचे
जोरात पडू लागले

लूट करूनी स्वार्थ साधला
बदनामीचा डाव तो रचला
माझ्या धनावरीच हो त्यांनी
नित्य चंग बांधला

कावा समजता दूर जाहलो
कोडे सुटू लागले
तेव्हा पाऊल प्रगतीचे
जोरात पडू लागले

स्वार्थ साधण्या जवळ ते येती
परंतु नित्य षडयंत्र ते रचती
समजून नाही येत तुम्हाला
कारण तुमच्या जवळ ते असती

अचानक त्यांचे खरे रूप
सामोरी येऊ लागले
तेव्हा पाऊल प्रगतीचे
जोरात पडू लागले

खोटे ऐकून तुम्हास छळती
खरे म्हणूनी खोटे पेरती
समाजातल्या नीच जनांची
झाली ओळख आता पुरती

नीट ओळखूनी आयुष्यातूनी
त्यांना दूर सारले
तेव्हा पाऊल प्रगतीचे
जोरात पडू लागले

प्रगती पाहून जवळ ते येतील
स्तुती पुन्हा ते करू लागतील
कठोर व्हावे तेव्हा मनाने
अन्यथा पुन्हा दगा ते करतील

त्यांच्यासाठी कठोर व्हावे
मनी जेव्हा कोरले
तेव्हा पाऊल प्रगतीचे
जोरात पडू लागले

✒️ K. Satish




Featured Post

माझा कवितासंग्रह

कळले नाही मला  हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता  डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने  क्षण जागे झाले....

Popular Posts