Thursday, June 11, 2026
सन्मानाची तुलना
Thursday, February 2, 2023
हसत जगावे जीवनात या
चमचम तारे जीवनातले
क्षण हे गेले विरून,
हसत जगावे जीवनात या
जगू नये हो झुरून
जीवन ऐसी नाव की ज्याचा
प्रवास ऐसा होवे,
आनंद-दुःख, प्रेम-मत्सर अन्
यामध्ये हेवेदावे
क्षण हे पुढे पुढे जगताना
मन ठेवावे तरूण,
हसत जगावे जीवनात या
जगू नये हो झुरून
वार्धक्य हे कुणा न चुकले
सर्वांना ते येई,
काळानुसार जीवनातले
अनुभव देऊनी जाई
कवटाळूनी आनंदी क्षणांना
दुःख टाकावे पुरून,
हसत जगावे जीवनात या
जगू नये हो झुरून
बालपणीचे, तारूण्याचे
आणिक वार्धक्याचे,
जीवनातले टप्पे तीन हे
भिन्न भिन्न वळणाचे
वार्धक्यानंतरही जगावे
मन प्रफुल्लित करून,
हसत जगावे जीवनात या
जगू नये हो झुरून
✒ K.Satish
Tuesday, January 17, 2023
लाटणे
पोळपाटावर फिरते ऐटीत
रोजचा त्याचा सराव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
अन्नासाठी धडपडतो तो
मनुष्य रात्रंदिनी,
बनविती जेवण त्यांच्यासाठी
रोज साऱ्या गृहिणी
भाजीसंगे पोळी शोभते
शोभत नाही पाव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
धार नसे कसलीही याला
तरीही शस्त्र हे मोलाचे,
धाक दावण्या हे आवडते
हत्यार साऱ्या स्त्रियांचे
परवान्याची गरज नसे
नसे खोल हो याचा घाव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
किस्से याचे खूप मजेशीर
विविधतेने नटलेले,
दारूड्याचे डोके पाहिले
याच्यामुळेच फुटलेले
काळजी घ्यावी जेव्हा हे असती
पत्नीच्या हातातं राव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
महती याची मोठी आणिक
कार्यही याचे मोठेच हो,
शान असे स्वयंपाकघराची
जागा व्यापते छोटीच हो
अस्तित्व याचे घराघरामध्ये
स्वयंपाकघर याचे गाव,
कणकेला त्या आकार देई
लाटणे त्याचे नाव
✒ K. Satish
Sunday, November 20, 2022
असे आम्ही गुलाम
हात आमचे दगडाखाली
बोलायची झाली चोरी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
नको ते उपकार घेतले
झोळी आम्ही भरून घेतली
आज तीच लाचारी आमच्या
सार्या हक्कांवरती बेतली
गुलामीचे जीवन जगतो
अब्रू घालवली सारी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
पश्चात्ताप होतोय आम्हाला
पण सांगू कसे कुणाला
या सार्याची खंत माहित
आहे आमच्या मनाला
स्वार्थ साधला असला तरी
मनाला येईना उभारी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
वाटते आम्हालाही बोलावे
मत आमचे व्यक्त करावे
झाल्या चुकांची मागून माफी
सहकाऱ्यांचे पाय धरावे
पण चुगल्या करून बरबटलो
विश्वास न कोणी करी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
स्वार्थ साधला दोन घडीचा
भोग मात्र आयुष्यभराचे
माणूस असलो आम्ही तरीही
जगतो जीवन जनावराचे
सत्यासाठी लढणाऱ्यांचे
लढे उध्वस्त करी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
आमच्यासारखे असंख्य लाचार
आहेत अवतीभवती
म्हणूनच तर सामान्यजनांच्या
जीवनाची झाली माती
आदेशाचे गुलाम आम्ही
पाप्यांची करी चाकरी
आम्ही दिली दुसर्याच्या हाती
आमच्या अस्तित्वाची दोरी
✒ K. Satish
Friday, November 18, 2022
कपाट
तुमच्या सेवेसाठी अविरत
ओझे घेऊनी उभा मी ताठ
गरज तुमची भागवतो मी
नाव माझे आहे कपाट
रंग निराळे रूप निराळे
वापर माझा निरनिराळा
कधी असे मी स्वच्छ नि सुंदर
कधी असे मजवरी धुराळा
कपडे लत्ते, दागदागिने
प्राॅपर्टीचे पेपर, पैसा
सामावले मजमध्ये सारे
हस्ती नसे मी ऐसा तैसा
कधी मोडकळीला येतो
तरीही अविरत सेवा देतो
गरज माझी संपल्यावरती
अलगद भंगारामध्ये जातो
मनुष्य म्हणजे कपाटच हो
सारे काही सामावूनी घेतो
कार्यभाग तो संपल्यावरती
साऱ्यांनाच नकोसा होतो
अविरत ओझे वाहत जातो
अखेर कधीतरी हतबल होतो
झीज होऊनी या देहाची
या सृष्टीला सोडूनी जातो
✒ K. Satish
Featured Post
माझा कवितासंग्रह
कळले नाही मला हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने क्षण जागे झाले....
Popular Posts
-
कळले नाही मला हे शब्द कसे आले, लिहीत गेलो हळूहळू अन् काव्य पूर्ण झाले. शांतपणे बसता डोळे मिटून गेले, स्मृतीमधील काही जुने क्षण जागे झाले....
-
म्हणते कोणी विद्रोही मजला म्हणते कोणी वेडा मुखात कटू पण सत्य बोलतो जसा औषधी काढा इथे नित्य स्तुतीची आस मोठेपणाचा सर्वांना ध्यास पचेल कैसे क...
-
खिसेकापूने खिसा कापला तरीही नाही कळले मला देतो म्हणूनी काढून घेणे असे ही मोठी अजब कला समस्यांच्या जाळ्यामध्ये अडकवूनी ठेवली जनता गांगरला हो ...


%20Poetrymirror.com%20title%20images_40.jpg)
%20poetrymirror.com-1_401.jpg)
%20Poetrymirror.com%20title%20images_36.jpg)
%20poetrymirror.com-1_398.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_28.jpg)
%20poetrymirror.com-1_405.jpg)
%20Thoughtswing.com%20title%20images_22.jpg)
%20poetrymirror.com-1_255.jpg)